राजकीयस्थानिक बातम्या

कचरा निर्मूलन वेळेवर, शिस्तबद्ध पद्धतीने करा अन्यथा करणार कारवाई

दुसऱ्या दिवशीही भेटीचा धडाका सुरू, महापौरांनी घंटागाडी केंद्रावर कर्मचाऱ्यांच्या व्यथा घेतल्या जाणून !

जळगाव : (धर्मेंद्र राजपूत) दि.17 शहरातील विकास कामांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी, १७ फेब्रुवारी रोजी सकाळी पुन्हा एकदा भेटीचा धडाका कायम ठेवला. महापालिकेच्या जुन्या टीबी हॉस्पिटल परिसरातील घंटागाडी केंद्राला त्यांनी अचानक भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. यावेळी महापौरांनी थेट कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता, कर्मचाऱ्यांनी समस्यांचा पाढाच महापौरांसमोर वाचला. केंद्रावरील पाहणीदरम्यान महापौरांना अनेक त्रुटी आणि कर्मचाऱ्यांच्या गंभीर अडचणी दिसून आल्या.

वाहनांमध्ये डिझेल नेहमी कमी असते, कॉन्टॅक्टर वेळेवर उपस्थित नसतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नाही. अनेकदा लागणारा दंड आमच्या पगारातूनच भरला जातो, अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी केली. शहरात घंटागाडी काही ठिकाणी येते तर काही ठिकाणी जात नाही, अशा तक्रारींवर महापौरांनी विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनी तांत्रिक अडचणी सांगितल्या.

कचरा खाली करण्यासाठी कॉम्पॅक्टर यंत्राकडे जावे लागते, तिथे वाहन रिकामे होण्यासाठी खूप वेळ लागतो. या रांगेमुळे नियोजित कॉलनीमध्ये कचरा संकलनासाठी वेळेवर पोहोचता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी वाहनांच्या उपलब्धतेबाबतची माहितीही समोर आली. शहरात सध्या ८३ जुन्या आणि २१ नवीन अशा एकूण १०४ घंटागाड्या आहेत, त्यापैकी ८८ गाड्या प्रत्यक्ष कार्यरत आहेत. तर १६ गाड्या ब्रेक डाऊन स्थितीत आहेत. ७ जुने आणि ६ नवीन असे एकूण १३ कॉम्पॅक्टर असून त्यातील ८ सध्या सुरू आहेत. याशिवाय ९ पिकअप, ६ डम्पर आणि ३ स्किप लोडर अशी यंत्रणा शहरात तैनात आहे.

या सर्व प्रकाराची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी बीव्हीजी कंपनीचे प्रोजेक्ट हेड विनोद रेड्डी यांच्याकडून कामाचा जाब विचारला. “शहरातील कचरा निर्मूलन वेळेवर आणि शिस्तबद्ध पद्धतीने झालेच पाहिजे. कामे जर वेळेवर झाली नाहीत, तर प्रसंगी तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असा कडक इशारा महापौरांनी यावेळी दिला. शहराची स्वच्छता राखण्यासाठी मला घंटागाडी केंद्रामध्ये शिस्त लावावी लागेल, असा दमही त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना भरला.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button