प्लास्टिकमुक्त जळगावसाठी मनपा आक्रमक ; महापौर, उपमहापौरांचा कडक इशारा
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !


जळगाव :(धर्मेंद्र राजपूत) दि.16 शहराला प्लास्टिकच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने आता ‘आरपार’ची लढाई सुरू केली आहे. महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांची तातडीची बैठक घेऊन १ मार्चपर्यंत प्लास्टिक विक्री थांबविण्यासाठी अंतिम मुदत दिली आहे. त्यानंतरही प्लास्टिक आढळल्यास २५ हजार रुपयांचा दंड आणि प्रसंगी गरज पडली तर गुन्हे दाखल करण्याचा कडक इशारा देण्यात आला आहे.

महापौर दालनात सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी ही महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, सहायक आयुक्त (आरोग्य) उदय पाटील, वरिष्ठ आरोग्य अधीक्षक रमेश कांबळे, प्लास्टिक विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष कमल शामनानी व धनराज चावला, डॉ. लीना पाटील यांच्यासह ‘माझे शहर माझी जबाबदारी’ ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
उपमहापौर मनोज चौधरी म्हणाले की, प्लास्टिकमुळे कॅन्सर, दमा यांसारख्या गंभीर आजारांचे रुग्ण वाढत असून पर्यावरणाचेही मोठे नुकसान होत आहे. गाईंच्या पोटात प्लास्टिक आढळत असल्याच्या घटना हृदयद्रावक आहेत. त्यामुळे विनंतीवजा आवाहन करण्यासाठी ही बैठक बोलावली आहे.
महापौर दीपमाला काळे म्हणाल्या की, १ मार्चपर्यंत व्यापाऱ्यांना आपला माल हटवण्यासाठी मुदत देत आहे. त्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता थेट ‘कडक’ कारवाई केली जाईल. प्लास्टिक ऐवजी कंपोस्टेबल बॅग्स व कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन करत आहोत. विशेषतः महिला बचत गटांकडून कापडी पिशव्या घेतल्यास त्यांना रोजगारही उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ. लीना पाटील यांनी पर्यावरणपूरक थैली व इतर साहित्य वापरणेविषयी माहिती दिली.
शहरात कोणी प्लास्टिक विकत असेल, तर नागरिक थेट महापौर किंवा उपमहापौरांशी संपर्क साधून तक्रार करू शकतात, असेही महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले. व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि प्लास्टिक निर्मूलनासाठी चर्चेला बोलावणारे हे पहिलेच महापौर असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यापाऱ्यांनी दिली. प्रशासनाचा पहिला टप्पा हा सिंगल युज प्लास्टिक (कॅरिबॅग) बंद करण्यावर असेल. १५ मार्चनंतर पुन्हा एकदा आढावा बैठक घेतली जाणार आहे.
“जळगावच्या नागरिकांच्या हितासाठी आणि भविष्यातील भीषण समस्या टाळण्यासाठी आपण हा निर्णय घेत आहोत. लोकांना प्लास्टिकची पिशवी मागण्याची व घेण्याची लागलेली चुकीची सवय आपल्याला मोडावी लागेल. ही पहिली सामंजस्यपूर्वक सूचना आहे, यानंतर थेट कारवाई होईल.”- दीपमाला काळे, महापौर.




