जैन हिल्स जळगाव येथे फालीच्या ९ व्या संमेलनात १५५ शाळांमधील १०८५ विद्यार्थ्यांचा असणार सहभाग
- जळगाव २७ मे (धर्मेंद्र राजपूत) :- जैन हिल्स येथे Future Agriculture Leaders of India (फाली) उपक्रमात महाराष्ट्र व गुजरातमधील १५५ सरकारी अनुदानित ग्रामीण शाळांमधील १०८५ विद्यार्थी सहभागी होत आहेत. शाळांमधील इन्होवेशन व कृषी व्यवसाय योजना स्पर्धांचे विजेते असलेले ८ वी व ९ व्या इयत्तेतील विद्यार्थी संमेलनामधे सादरीकरण करतील. संमेलन आयोजनाचे हे ९ वे वर्ष असून ते १ व २, ४ व ५, आणि ७ व ८ जून अशा तीन टप्प्यामधे जैन हिल्स जळगाव येथे पार पडेल.
फाली या अत्यंत अनोख्या आणि प्रभावशाली कार्यक्रमाने १३,००० विद्यार्थ्यांसह नववे वर्ष पूर्ण केले आहे. आधुनिक, शाश्वत शेती आणि कृषी उद्योगात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना तांत्रिक, व्यवसाय आणि नेतृत्व काैशल्ये आणि संधी देऊन पुढील पिढी शेती क्षेत्राकडे आकर्षित व्हावी यासाठी फाली कार्यरत आहे.
असोसिएशन फाॅर फ्युचर अग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडियाची स्थापना कंपनी कायदा कलम ८ अंतर्गत झाली आहे. कंपनीचे संचालक : नादिर गोदरेज – गोदरेज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, राजू श्राॅफ-यूपीएलचे अध्यक्ष, अनिल जैन – जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नॅन्सी बॅरी – एनबीए एंटरप्राइझ सोल्युशन्स टू पाॅव्हर्टीच्या अध्यक्षा यांचा समावेश आहे. फालीमधील प्रमुख सीएसआर योगदानकर्ते गोदरेज ऍग्रोव्हेट, युपीएल, जैन इरिगेशन, स्टार अग्री, रॅलीज आणि ऑम्निवोर या कंपन्या आहेत. या अर्थिक वर्षात फालीला सहकार्य देण्यासाठी इतर अनेक अग्रगण्य कृषी व्यवसाय आणि बँका सामील होण्याची शक्यता आहे.
फालीच्या मागील ९५ टक्केपेक्षा जास्त विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे म्हणणे आहे की, फालीने आधीच करिअर म्हणून शेतीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे. ते आता आधुनिक शेती आणि कृषी-उद्योगाकडे एक उत्तम आकर्षक भविष्य म्हणून पाहतात. ते म्हणतात की, फाली उपक्रमाने त्यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक ती दिशा आणि योगदान दिले आहे. बहुतांश फाली विद्यार्थी घरच्या शेतीत किंवा कृषी उद्योगात काम करतानाच प्रामुख्याने कृषी, विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात उच्च शिक्षण घेत आहेत. ३३,००० पेक्षा जास्त माजी फाली विद्यार्थ्यांसह फाली उपक्रमाने माजी फाली विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप, शिष्यवृत्ती आणि व्यवसाय निधी कार्यक्रम तयार केला आहे. ज्यात फालीच्या प्रायोजक कंपन्या विद्यार्थ्यांना थेट सहकार्य देतात. हे फाली विद्यार्थ्यांना त्यांच्या उमेदीच्या काळात महत्त्वाच्या टप्प्यांवर कृषी आणि कृषी-उद्योगाबद्दलचे त्यांचे ज्ञान आणि वचनबद्धता दृढ करण्यासाठी प्रोत्साहित करते.
फालीचे दोन दिवसीय होणारे ३ समान भागांमध्ये नववे संमेलन जूनच्या पहिल्या आठवड्यात जैन इरिगेशन जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. फालीच्या १०८५ विद्यार्थ्यांसोबत कंपन्या आणि बँकांचे ५० हुन अधिक प्रतिनिधी सामील होतील जे फालीला सीएसआर निधीतून सहकार्य करतात. क्षेत्र भेटीसाठी मार्गदर्शक म्हणून काम करतात, वेबिनार आणि फाली इनोव्हेशन फिल्म्समध्ये भाग घेतात आणि नाविन्यपूर्ण स्पर्धाचे परीक्षण करतात. फाली अधिवेशनात भाग घेणाऱ्या कंपन्यांचे व्यवस्थापक या तरुण लीडरला मार्गदर्शन करतात आणि त्यांना शेती व्यवसाय करण्यास प्रेरित करतात. फालीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी फालीचे माजी विद्यार्थी देखील अधिवेशनाला उपस्थित राहतात..
पहिल्या दिवशी, फाली विद्यार्थी आणि सहभागी कंपनी व्यवस्थापकांना जैन सिंचन, फळ प्रक्रिया, टिश्यू कल्चर आणि इतर प्रक्रियाची माहिती दिली जाईल आणि सायंकाळी फाली विद्यार्थी आधुनिक, प्रगतशील शेतकऱ्यांशी चर्चा करतील. दुसऱ्या दिवशी, फालीचे विद्यार्थी बिझनेस प्लॅन आणि इन्होव्हेशन स्पर्धांमध्ये भाग घेतील. त्यासाठी कंपनी व्यवस्थापक परीक्षक म्हणून काम करतील.