शैक्षणिकराज्य

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेमध्ये गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्रथम

JALGAON TIMES

जळगाव दि.२९ – छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची मूळ संकल्पना महाराष्ट्रातून मांडली, पुढे अहिंसेतून महात्मा गांधीजींनी मानवतेच्या कल्याणासाठी स्वराज्यातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आता आपली जबाबदारी खूप महत्त्वाची आहे भविष्यातील पिढीसाठीच नाहीतर पृथ्वीवरील मुक्याप्राण्यांसाठी अहिंसेतून स्वराज्याची निर्मिती केली पाहिजे, त्यासाठी समुद्रामध्ये जाणारे प्लास्टिक घरातच थांबविले पाहिजे, असे आवाहन पुणे येथील सागर मित्र अभियानाचे सह-संस्थापक विनोद बोधनकर यांनी केले.

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित ‘गांधी तीर्थ स्वच्छ शाळा’ राज्यस्तरीय प्रतियोगितेचा पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. व्यासपीठावर जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ मीनल करनवाल, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या राज्य सल्लागार परिषदेचे सदस्य अनिल बोरनारे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे चेअरमन अशोक जैन, अंबिका जैन, गांधी विचार संस्कार परिक्षेचे समन्वयक गिरीष कुलकर्णी यांची उपस्थिती होती. राज्यस्तरातून गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे ता. चिपळूण जि. रत्नागिरी प्रथम आली. तर ग्रामीण मधील प्रथम दलवाई हायस्कूल मिरजोळी, तालुकामधील प्रथम सानेगुरुजी निवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केज, जिल्हास्तरावरील प्रथम भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघोली जि. पुणे विजयी झालेत.

 

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजयी शाळांना सन्मानित करण्यात आले. पारितोषिकासाठी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांचे प्रायोजकत्व होते. प्रास्ताविक गिरीष कुलकर्णी यांनी करुन उपक्रमाविषयी माहिती दिली. यावेळी संपूर्ण राज्यातून मुख्याध्यापक, समन्वयक, शिक्षक, पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रातिनिधीक स्वरूपात मुख्याध्यापक व शिक्षक यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच संपूर्ण वर्षभर गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगिते अंतर्गत राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे व्हिडीओ सादरीकरण करण्यात आले. चंद्रशेखर पाटील यांनी आभार मानले.

‘प्लास्टीक कचऱ्याचे दुष्परिणाम’ यावर मार्गदर्शन करताना विनोद बोधनकर यांनी सांगितले की, मानवाला वाचविण्यासाठी जनजागृतीसोबतच श्रमजागृती विद्यार्थ्यांमध्ये केली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन, अध्यात्मिक मूल्ये, लोक सहभाग आणि जागतिक नागरिकत्व या संकल्पनांतून ज्ञान, भक्ती आणि कर्म योग शिकविला पाहिजे. जमिनीवरील ३० टक्के जंगले असून त्यावर कुऱ्हाडी मारतो ही बाब गंभीर असून जमीनीपेक्षा खाऱ्या पाण्यातील ७० टक्के जंगल जे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देते, त्यावर प्लास्टीकचा अतिरेक वापर करुन ते नाले, ओढे, नदीमार्फत समुद्रापर्यंत पोहचवून सर्वात मोठी कुऱ्हाड आपण प्रत्येक जण चालवित आहेत, याची जाणीव मुलांमध्ये संस्कारातील करावी. समुद्रावरील संकट त्यांच्यापर्यंत पोहचविले पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली विश्व कल्याणाची व्यापकता भविष्यातील समाज घडविण्यास मदत करेल असे त्यांनी सांगितले.

 

अध्यक्षीय मनोगत अशोक जैन यांनी व्यक्त केले. त्यात त्यांनी ‘सार्थक करुया जन्माचे रूप पालटू वसुंधरेचे’ याप्रमाणे आपण जन्माला आलो त्यापेक्षा परिसर अधिक सुंदर करुन सोडले पाहिजे. ह्याच संस्कारातून प्रत्येक सहकारी जैन हिल्स याठिकाणी कार्य करतो. त्याचाच भाग म्हणून गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगिता समोर आली. भविष्यात याचे स्वरुप मोठे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

स्व: ग्रामातून देश बदलवू – मीनल करनवाल

शाळेत जे मुलांवरती संस्कारित होते ती संवेदना कायम स्मरणात राहते. पर्यावरणीय दृष्ट्या प्लास्टीक हानिकारक हे लहानपणीच त्यांच्या लक्षात येत असल्याने भविष्यात त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढतील. स्व: ग्राम म्हणजे माझं गाव त्यातील सरपंच, शिक्षक, मुख्याध्यापक आणि गावकरी यांनी ठरविले तर गावातूनच देश बदलविण्याची ताकद उभी राहू शकते. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धा हे चांगल्या कार्याचे प्रतिक आहे. सामाजिक जबाबदारीतून कुटुंब प्रमूख अशोक जैन यांच्यासह जैन परिवार महाराष्ट्रात महत्त्वपूर्ण कार्य करत असल्याचेही मीनल करनवाल म्हणाले.

शिक्षक हे समाजासाठी आयकॉन – अनिल बोरनारे

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा स्पर्धेत सहभाग घेऊन वर्षभर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक हे खऱ्या अर्थाने समाजासाठी आयकॉन आहेत. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये असलेला अभ्यासक्रम याठिकाणी गेल्या २५ वर्षापूर्वीच श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी कृतिशीलपणे अंमलात आणल्याची जाणिव परिसर बघितल्यानंतर होत असल्याचे अनिल बोरनारे म्हणाले. गांधी विचार संस्कार परिक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेपर्यंत पोहचविण्याचे काम आरटीई अंतर्गत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातून गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्रथम

जैन हिल्सवरील गांधी तीर्थच्या कस्तुरबा सभागृहात झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये राज्यातून प्रथम पुरस्कार गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे ता. चिपळूण जि. रत्नागिरी शाळेस प्राप्त झाला. त्यांना रुपये एक लाखाचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात आले. ग्रामिण स्तरावर स्वा. सै. पी. डी. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद द्वितीय तर जि. प. प्रशाला गणोरी ता. फुलंब्री व शंकर विद्यालय तळवेल जि. अमरावती यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला. तालुकास्तरावर श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सगरोळी, जि. नांदेड, द्वितीय तर जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येडशी जि. धाराशीवला तृतीय पुरस्कार प्राप्त झाले. जिल्हा स्तरावरील द्वितीय क्रमांक श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला तर तृतीय क्रमांक नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज जळगावला प्राप्त झाला. उत्तेजनार्थ म्हणून शासकीय इंग्रजी माध्यम निवासी आश्रम शाळा मुंढेगाव व तात्यासाहेब पी. सी. पाटील माध्यमिक आश्रम शाळा तळबंत तांडा यांना गौरविण्यात आले. जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कारप्राप्त शाळांना रुपये एकावन्न हजार, एकतीस हजार व एकवीस हजार रोख व सन्मानचिन्ह देण्यात आलीत. तर उत्तेजनार्थसाठी रुपये अकरा हजार रोख पारितोषिक देण्यात आलीत. तसेच अंतिम मूल्यांकनासाठी पात्र ठरलेल्या शाळांनासुद्धा विशेष पुरस्काराने सन्मानित केले.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button