शैक्षणिकराज्य

विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस मोठ्या जल्लोषात…

विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पगुच्छ व टाळ्याच्या गजरात स्वागत; खासदार, आमदार यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव दि. १६ जून (JALGAON TIMES): राज्य शासनाच्या ‘शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६’ उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील १८६० जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगर परिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ आज उत्साहात झाला. सर्व शाळांमध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पगुच्छ देऊन, टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. खा. स्मिता वाघ, आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे, आ. अमोल चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवत वातावरण आनंदमय केले.

अमळनेर तालुक्यातील जवखेडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. गणवेश, शालेय साहित्य वाटप आणि वृक्षारोपण यासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत अडावद कन्या व अडावद मुले शाळांमध्ये तर पारोळा तालुक्यातील कन्हेरे शाळेत आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करून गणवेश पाठयपुस्तकं देण्यात आली.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जामनेर तालुक्यातील भराडी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके वितरित केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी नांद्राबु. व पिलखेडे शाळांमध्ये गुलाबपुष्पांनी स्वागत करून पाठ्यपुस्तके वाटप केले. पिलखेड येथे “ग्रंथ दिंडी” चे आयोजनही करण्यात आले.

भुसावळ येथे तहसीलदार नीता लबडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी शिरसोली प्र. बो. येथील शाळेला भेट दिली, नगर प्रशासनाचे सहायक आयुक्त जनार्दन पवार वडगाव लांबे (चाळीसगाव) शाळेत, तर सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भुषण वर्मा पी.एम. श्री नानासाहेब विष्णु हरी पाटील विद्यामंदिरात सहभागी झाले. चोपड्याचे मुख्याधिकारी राहुल पाटील व जामनेरचे विवेक धांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी (उर्दू शाळा, चोपडा ), उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार (जिराळी), जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील विदगाव (ता. जळगाव),नायब तहसीलदार रविंद्र उगले (महिंदळे), मुख्याधिकारी रविंद्र लांडे (गिरड), निवासी नायब तहसीलदार सुधीर सोनवणे (भडगाव शाळा क्र. २), जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक (गारखेडे खु.) आणि तहसीलदार विजय बनसोड (पाचोरा) यांच्या सह जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी विविध शाळांना उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले,विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

या शाळा भेटींमुळे ग्रामीण भागात नवचैतन्य निर्माण झाले असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि शाळेविषयी आकर्षण निर्माण झाले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button