ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळा कांताई सभागृह येथे संपन्न

जळगाव दि. २३ (धर्मेंद्र राजपूत)– सरकारने ज्याप्रमाणे लाडकी बहिण योजना आणली त्याप्रमाणे ज्येष्ठांसाठी लाडके आई-आजोबा म्हणून मदत केली पाहिजे. कुटुंब पद्धती ज्याप्रमाणे बदल आहे त्याप्रमाणे समाजातील ज्येष्ठाविषयीचे आचरणही बदलत आहे. त्यामुळेच सरकारसोबत समाजातील प्रत्येक घटकाने वृद्धांविषयी आपली जबाबदारी व कर्तव्य ओळखली पाहिजेत, गाव तेथे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ ही संकल्पना राबवून तेथील ज्येष्ठांना आर्थिक अनुदान दिले पाहिजे, रेल्वे मधील आरक्षणाची मागणीसाठी पाठपुरावा सुरू असुन ती पुर्णत्वास देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न होत असल्याची माहिती महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे यांनी दिली.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या सहकार्यातून माजी अध्यक्ष, खान्देश प्रादेशिक विभाग धुळे व ज्येष्ठ नागरिक संघ चैतन्य नगर जळगाव तर्फे आयोजित ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळेत डॉ. अण्णासाहेब टेकाळे अध्यक्ष म्हणून बोलत होते. ही सभा कांताई सभागृह येथे संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून जैन इरिगेशनचे मिडीया विभागप्रमुख अनिल जोशी उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र व गोवा राज्याचे बार कौन्सिल चे माजी अध्यक्ष ऍड. भरत देशमुख, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे माजी अध्यक्ष डी. टी. चौधरी, अरूण रोडे, उपाध्यक्ष अंजुमन खान, माजी कार्यवाहक प्रकाश घादगिने, खान्देश प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष बी. एन. पाटील उपस्थित होते. त्यांच्यासोबत कार्यवाहक जगतराव पाटील, ऍड. प्रभाकर घुमासे, अरूण माळी, डॉ. एस. आर. पाटील, एस. बी. महाजन, रमेश जोगी, विजय करोडपती, बाळकृष्ण वाणी यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला खरा तो एकची धर्म… ही प्रार्थना बी. एन. पाटील यांनी म्हटली. राज्य गीत गर्जा महाराष्ट्र माझा.. हे स्वरवेध फाऊंडेशनचे भागवत पाटील सह कलावंतांनी सादर केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन कार्यशाळेचे उद्घाटन झाले. जिल्हाभरातून ज्येष्ठ नागरीकांची लक्षणिय उपस्थिती होती. प्रास्ताविक डी. टी. चौधरी यांनी केले. प्रतिभा पाटील यांनी सुत्रसंचालन केले. शालिनी सोनवणे यांनी आभार मानले. यावल समाचार पत्रिकेचे प्रकाशन झाले यशस्वीतेसाठी विश्वासराव सोनवणे, प्रकाश नाईक, दिलीप बोरसे, के. डी. पाटील, विकास बोरोले यांच्यासह कार्यकारिणी मधील सदस्यांनी सहकार्य केले. पसायदाने समारोप झाला.
संघटनेची कार्यपद्धती, घटनेने कार्यकर्त्यांनी दिलेले अधिकारी, समाजसेवेसाठी असलेली जबाबदारी, आनंदी वृद्धत्व, ज्येष्ठांविषयी कायदे आणि त्याद्वारे मिळणारे संरक्षण, शासकीय योजनांविषयी माहिती यासह विविध विषयांवर कार्यशाळेत प्रकाश टाकण्यात आला.
उदघाटक म्हणून अनिल जोशी यांनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्यात. ऍड. भरत देशमुख यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीचा २००७ च्या कायदेविषयक तरतुदी बाबत अवगत केले. दिवाणी न्यायालयाने दिलेले अधिकार, प्रत्येक जिल्हा व तालुका आणि गाव पातळीवर असलेल्या समन्वय समितींचे अधिकार, निर्वाहाचा आदेश यासह अन्य महत्त्वपूर्ण कायदेविषयक माहितीवर त्यांनी विवेचन केले. ज्येष्ठ नागरिकांनी जर मुलगा-मुलींना स्थावर व जंगम मालमत्ता नावे केली असेल तर ती पुन्हा परत घेता येऊ शकते याविषयीचा उपस्थित ज्येष्ठांमध्ये त्यांनी विश्वास निर्माण केला.
जगतराव पाटील यांनी ज्येष्ठ शेतकऱ्यांकडे नेहमी दुर्लक्ष होत असल्याची बाब लक्षात आणून दिली. शहरातील ज्येष्ठांना पेन्शनसह अन्य सुविधा मिळत असतात त्यामानाने ग्रामीण भागातील ज्येष्ठांना आधार मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
बी.एन.पाटील यांनी तुकाराम महाराजांचे भजन म्हटले. प्रकाश घादगिने यांनी ‘वयोवृद्ध मनोयुवा’ याविषयी सांगत परिवर्तन हे ज्येष्ठांमुळे होऊ शकते सांगितले. ज्याप्रमाणे शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी आमदार आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमदार असला पाहिजे यासाठी प्रयत्न करावे असे सुचविले. ज्येष्ठांसाठी असलेले स्वतंत्र महामंडळाला आर्थिक तरतुद करुन त्याचा लाभही मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली. अंजुमन खान यांनी ही मनोगत व्यक्त केले.
डी. टी. चौधरी यांनी आनंदी वृद्धत्व ह्याविषयी सांगितले. अरूण रोडे यांनी संघटनेच्या मसुदा घटनेविषयी सांगितले. घटना ही प्रत्येक कार्यकर्त्याजवळ असावी जेणेकरून आवश्यकता असणाऱ्यांना मदत करता येईल व समाजभिमुख काम पुढे नेता येईल.असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिकांनी प्रश्नोत्तरोद्वारे आपल्या शंकाचे निरसन करुन घेतले.