जिल्हाधिकारी आयुष प्रसाद डिजिटल प्लॅटफॉर्मवर 25 फेब्रुवारी रोजी लोकांच्या भेटीसाठी उपलब्ध

जळगाव (धर्मेंद्र राजपूत) दि. 2 जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण व्हावे यासाठी “सहाय्य संकल्प” या डिजिटल उपक्रमांतर्गत 25 फेब्रुवारी रोजी ऑनलाइन माध्यमातून लोकांशी संवाद साधणार आहेत. या माध्यमातून नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत त्यांच्या समस्या पोहोचवण्याची संधी मिळणार आहे.
डिजिटल माध्यमातून संवाद
“सहाय्य संकल्प” अंतर्गत जिल्ह्यातील विविध योजनांचे लाभ पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. याच अंतर्गत जिल्हाधिकारी 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे नागरिकांच्या समस्या ऐकून घेणार आहेत.
“सहाय्य संकल्प” उपक्रम
या उपक्रमाद्वारे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा आणि अपंग निवृत्तीवेतन योजना यांसारख्या विशेष सहाय्य योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. नागरिकांना यासाठी तालुका किंवा तहसील कार्यालयांना भेट देण्याची गरज भासणार नाही.
नागरिकांनी ऑनलाइन उपस्थित राहावे
या संवादासाठी नागरिकांना “आपले सरकार” पोर्टल किंवा महा ई-सेवा केंद्राद्वारे अर्ज सादर करता येईल. तहसील कार्यालयांमध्ये अर्ज स्वीकृती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली असून, यामुळे नागरिकांना अधिक सोईस्कर आणि पारदर्शक सुविधा मिळणार आहे.
तक्रारी आणि अर्जांची तत्काळ सोडवणूक
तक्रारींच्या संदर्भात तहसीलदार आणि संबधित विभागांच्या अधिकाऱ्यांची समिती 15 दिवसांत निर्णय घेईल. मंजूर किंवा नामंजूर अर्जांची माहिती लाभार्थ्यांना थेट कळवली जाईल.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, “सहाय्य संकल्प” उपक्रमामुळे नागरिकांना घरबसल्या सेवांचा लाभ घेता येईल आणि त्यांच्या तक्रारींवर वेगाने कार्यवाही केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी या डिजिटल संवादात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.