राज्यस्थानिक बातम्या

नाभिक कलादर्पण संघाचे तृतीय साहित्य संमेलन शनिवारी

भगवान चित्ते संमेलनाध्यक्षपदी तर प्रा. डॉ. चटपल्ली करणार उद्घाटन

जळगाव : महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाचे तृतीय साहित्य संमेलन कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या लेखणीने गंधित झालेल्या जळगाव शहरात शनिवार, दि.८ फेब्रुवारी रोजी साईलिला सभागृह, शिरसोली रोड येथे होत आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत या एकदिवसीय साहित्य संमेलनात सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक विषयावर विचारमंथन होणार असून २ परिसंवाद, १ कवी संमेलन आणि लोककलावंतांच्या कलाविष्काराचा यात समावेश आहे, अशी माहिती आयोजकांनी बुधवारी दिनांक ५ फेब्रुवारी रोजी दिली.

पत्रकार परिषदेला महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाचे उपाध्यक्ष मुकुंद धजेकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नेरपगारे, राजकुमार गवळी उपस्थित होते.नाभिक समाजात अनेक प्रतिभावंत साहित्यिक आणि कलावंत आहेत. परंतु त्यांना हक्काचे स्थान मिळत नसल्याने ते प्रकाशात येत नाहीत. परिणामतः त्यांची प्रतिभा दडून राहते. समाजातील अशा या सर्व प्रथितयश आणि नवोदित साहित्य, कलाप्रेमी आणि लोककलावंतांना हक्काचे स्थान मिळावे या सार्थ हेतूने महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाची स्थापना २०१९ मध्ये करण्यात आली. संघातर्फे प्रथम साहित्य संमेलन अमरावती येथे ९ नोव्हेंबर २०१९ ला तर द्वितीय साहित्य संमेलन शेगाव येथे ८ मार्च २०२२ रोजी यशस्वीरित्या संपन्न झाले. आता हे तिसरे साहित्य संमेलन जळगाव येथे होऊ घातले आहे.

 

शनिवारी आयोजित तृतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक तथा नाभिक मंच संपादक, धुळे येथील भगवान चित्ते यांची तर, उद्घाटक म्हणून बंगळूरू येथील प्रा. डॉ. विष्णुकांत चटपल्ली (माजी उपकुलगुरू, कर्नाटक राज्य ग्रामीण विकास व पंचायत राज युनिव्हर्सिटी, गदग, कर्नाटक) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष रविंद्र (बंटी) नेरपगारे (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, जळगाव) हे असून प्रमुख अतिथी म्हणून सयाजी झुंजार (प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ), रितेश सेन (आमदार, वैशाली नगर, छत्तीसगड), मनोज महाले (उपसचिव, उपमुख्यमंत्री कार्यालय, मुंबई) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सत्रादरम्यान साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन केले जाईल. तसेच अनेक साहित्यिकांच्या काव्यसंग्रहाचे आणि साहित्यकृतीचे प्रकाशान मंचावरून केले जाणार आहे.

दोन परिसंवाद

या साहित्य संमेलनात दोन परिसंवाद होतील. ‘सकल नाभिक समाजाच्या उन्नतीसाठी उद्याच्या सामाजिक व राजकीय दिशा’ या परिसंवादात प्रमुख वक्ते महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याणजी दळे, दत्ताजी अनारसे, भगवान बिडवे, रवि बेलपत्रे तसेच राष्ट्रीय नाभिक संघटना, मुंबईचे अध्यक्ष अरुण जाधव, सकल नाभिक समाज माळशिरस, जि. सोलापूर येथील युवा नेतृत्व किरण भांगे हे सहभागी असतील. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर असतील. दुसरा परिसंवाद महिलांसाठी असून ‘नाभिक समाजातील महिलांचे सबलीकरण’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई वाघमारे असतील. यात निवृत्त शिक्षिका माया नंदुरकर, धुळे येथील डॉ. हर्षदा निंबा बोरसे, अलका सोनवणे, मुंबई येथील पुनम मनोज महाले यांचा सहभाग असेल.

कविसंमेलन आणि कलाविष्कार

दुसऱ्या सत्रात महाराष्ट्रातील कवींचे कवी संमेलन होईल. सूत्रसंचालन सर्जनशील शब्दवेल साहित्य मंच, पनवेलचे अध्यक्ष प्रवीण बोपुलकर करतील. तत्पूर्वी, समाजातील लोककलावंतांच्या कलाविष्काराचा कार्यक्रम देखील सादर केला जाईल. समारोपीय सत्रात महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाच्या कार्याचा आलेख आणि पुढील वाटचाल संघाचे अध्यक्ष शरद ढोबळे मांडतील. अध्यक्षांच्या उपस्थितीत ठराव घेऊन तिसऱ्या साहित्य संमेलनाचा समारोप होईल.

 

या साहित्य संमेलनास समाजातील साहित्य व कलाप्रेमींसह नाभिक समाज बंधू-भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघ कार्यकारिणी अध्यक्ष शरद ढोबळे, उपाध्यक्ष मुकुंद धजेकर, गोपाळकृष्ण मांडवकर, कार्याध्यक्ष प्रा.अविनाश बेलाडकर, चंद्रशेखर जगताप, अनिल मल्लेलवार, प्रकाश नागपूरकर, भगवान चित्ते, सचिव सुनीता वरणकर, कोषाध्यक्ष सतिश कान्हेरकर आदींनी केले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button