जळगाव (धर्मेंद्र राजपूत )दि.5 विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळालेले असून यात भाजपला सर्वाधिक 132 अधिक पाच अपक्ष असे 137 संख्याबळ प्राप्त झालेलं असून त्याखालोखाल शिवसेना शिंदे गटाला 57 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळालेल्या आहेत.या पार्श्वभूमीवर महायुतीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर आज मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी पार पडलेला असून तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांचेसह नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत इतर केंद्रीय मंत्री उपस्थित आहेत. तब्बल 22 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली. विविध क्षेत्रातील मान्यवरांना या ‘महा’शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं.
गिरीश महाजन जळगावचे पालकमंत्री होणार ?
जळगाव जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी पालकमंत्रीपद महत्त्वाचे असल्याने त्या दृष्टीने भाजपच्या नेत्यांनी व्यूहरचना आखलेली असून यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाची जबाबदारी ही भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले आणि जामनेर विधानसभा मतदारसंघातून सलग सातव्यांदा निवडून आलेले जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी लावून धरल्याची माहिती समोर आलेली असून आता याबाबत महायुतीचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे जळगाव जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून आहेत. तर दुसरीकडे ज्या पद्धतीने विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यातबाबतच्या प्रस्तावाला भाजपने सोशल इंजिनिअरिंग वापरून विविध जातीसमूहांच्या आमदारांना अनुमोदन देण्यासाठी जे प्रोत्साहन देण्यात आलेले आहे ,त्यावरून भुसावळचे अनुसूचित जाती या राखीव मतदारसंघाचे सलग चौथ्यांदा निवडून येऊन प्रतिनिधित्व करणारे आमदार संजय सावकारे यांच्याकडेही राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे?.तसेच पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांनी केलेल्या विकासकामांमुळे त्यांची नोंद टॉप 25 आमदारांमध्ये यापूर्वीच झालेली आहे. तसेच आमदार सुरेश भोळे (राजू मामा ) यांची स्वच्छ असलेली प्रतिमा या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.या दोन्ही आमदारांचे मंत्रीपदांच्या विषयांबाबतचे अधिकार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात असल्याने आणि दोघेही आमदार हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाकडे भाजपच्या कार्यकर्त्यांसह जळगाव जिल्ह्यातील जनतेचे लक्ष केंद्रीत झालेले आहे.