जयश्रीताई महाजन यांच्या प्रचाराला गुलाबपुष्प वृष्टी आणि घोषणांनी दणालला प्रभाग क्रमांक ७
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचार मोहिमेला आता जळगावकरांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. आज (दि. १६) प्रभाग क्र. ७ मधील प्रभुदेसाई कॉलनी ते गुरुदत्त कॉलनी येथील स्वामी समर्थ मंदिरापर्यंत प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत महाविकास आघाडीच्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रचार मोहिमेदरम्यान जयश्री महाजन यांनी जनतेशी संवाद साधत आपल्या वचननाम्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी खालील प्रमुख उपक्रम राबवण्याचे वचन दिले:
यात प्रामुख्याने आयटी पार्कची उभारणी : जळगाव शहरातील तरुणाईसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आयटी पार्क उभारण्याचे आश्वासन दिले. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हा प्रकल्प शहराच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी सांगितले. तसेच औद्योगिक वसाहतीचा प्रश्न सोडवण्याचा निर्धार असून, शहरातील औद्योगिक वसाहतीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे उद्योगांना चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील. याशिवाय शहरातील कृषी विद्यापीठाचा रखडलेला प्रश्न सोडवून तो तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या उपक्रमामुळे शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल.
जयश्री महाजन यांनी जळगावकरांना उद्देशून सांगितले, की “जळगावच्या सर्वांगिण विकासाचे व उज्ज्वल भविष्याचे माझे व्हिजन तयार आहे. ते साकार करायचे असेल, जळगाव शहराला पुन्हा सुवर्णनगरी म्हणून मान्यता मिळवून द्यायची असेल तर तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान यंत्रावरील क्रमांक २ चे ‘मशाल’ चिन्ह दाबून मला तुमचा मतदानरूपी आशीर्वाद द्या. आपण सर्वजण मिळून आपल्या प्रगत आणि विकसित जळगाव शहराचे स्वप्न साकार करूया.”
प्रचार रॅलीदरम्यान शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी जयश्री महाजन यांचे विविध ठिकाणी जोरदार स्वागत केले. गुलाबपुष्पांचा वर्षाव करत, घोषणाबाजीने प्रचार मोहिमेला जोर दिला. प्रभुदेसाई कॉलनीपासून स्वामी समर्थ मंदिरापर्यंत झालेल्या रॅलीला महिलांचा, युवकांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीदरम्यान जयश्री महाजन यांनी थांबून नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या ऐकल्या.