बहिणाबाईंच्या स्मारकाकडे दुर्लक्ष, काय विकास केला?.. देवकर
आमदार एकनाथराव खडसे; गुलाबराव देवकरांसाठी घेतली सभा
जळगाव : असोदा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाचे काम माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी त्यांच्या कार्यकाळात सुरू केले होते. मात्र, गेल्या १० वर्षांपासून सदरचे काम रखडले आहे. ज्या लोकप्रतिनिधींनी बहिणाबाईंच्या स्मारकाकडे इतके दुर्लक्ष केले, त्यांना असोद्यात मत मागण्याचा कोणताच अधिकार नाही, अशी टीका नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी केली.
महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ असोदा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना आमदार श्री.खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. असोदा परिसरासाठी तुम्ही कोणते ठोस काम केले, ते सांगा. रस्ते आणि गटारींसारखी किरकोळ कामे सांगू नका. शिवसेना सोडून एकनाथ शिदेंसोबत मुंबईहुन सुरतमार्गे गुवाहाटीला गेले. इकडून खाली हात गेले आणि तिकडून ५० खोके घेऊन आले. तुम्ही पाणी पुरवठा खात्याचे मंत्री असताना, जलजीवन मिशनच्या कामांची आज जिल्ह्यात काय स्थिती आहे. कोट्यवधींचा खर्च झाला तरी नळांना पाणी नाही. कुठे पाईपलाईन झाली तर विहिरीचा पत्ता नाही, कुठे विहीर झाली तर पाईपलाईनीचा पत्ता नाही, अशी परिस्थिती सर्वदूर आहे. असोद्यासारख्या गावात आजही २० दिवसाआड पाणी येते. मंत्र्यांकडे सांगण्यासारखे काहीच नाही. त्यासाठी विकासाची दृष्टी असलेल्या गुलाबराव देवकरांना यावेळी विजयी करा, असे आवाहन आमदार एकनाथ खडसे यांनी केले.
असोद्यातील बहिणाबाईंच्या स्मारकाला एक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आणण्याचा माझा मानस होता. त्यादृष्टीने आम्ही त्यावेळी मुंबईच्या प्रसिद्ध वास्तू विशारदांकडून सुगरणीच्या खोप्यासारखा आकार असणारा स्मारकाचा आराखडा देखील तयार करून घेतला होता. परंतु, नंतर सत्तेवर आलेल्या लोकप्रतिनिधींनी स्मारक पूर्ण तर केलेच नाही, उलट त्यांची उंची कमी करून टाकली. छतावर पत्रे टाकून त्याची पूर्णतः वाट लावली, असे माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले.
यांची होती प्रमुख उपस्थिती
उद्धव सेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटील, माजी जि.प.उपाध्यक्ष जानकीराम पाटील, कृऊबासचे माजी सभापती लक्ष्मण पाटील, विद्यमान उपसभापती प्रा.पांडुरंग पाटील, संचालक दिलीप कोळी, मनोज चौधरी, योगराज सपकाळे, गोकूळ चव्हाण, भादलीचे सरपंच मनोज चौधरी, असोद्याचे माजी सरपंच विलास चौधरी, छावा संघटनेचे भीमराव सपकाळे, मजूर फेडरेशनचे माजी सभापती लीलाधर तायडे, राष्ट्रवादीचे प्रदेश पदाधिकारी नामदेव चौधरी, जिल्हा समन्वयक वाल्मीक पाटील, दापोऱ्याचे नानाभाऊ सोनवणे, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख पंकज महाजन, किसान सेलचे तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, महानगर अध्यक्ष एजाज मलीक, सामाजिक न्यायचे दत्तू सोनवणे, आर.सी.महाजन, तुकाराम भोळे आदी व्यासपीठावर होते. असोद्याचे ग्रा.पं.सदस्य हेमंत पाटील यांनी सूत्रसंचालन केले.