जनसेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या रोहिणी खडसे यांना साथ द्या – जाफर शेख
बोदवड (धर्मेंद्र राजपूत ) : आमदार एकनाथराव खडसे यांनी आपल्या तीस वर्षाच्या काळात नेहमी शहराच्या विकासासाठी पुढाकार घेतला त्यांनी शहराच्या विकासासाठी वेळोवेळी निधी मंजूर करून आणला. बोदवड शहराचा व तालुक्याचा विकास करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते. त्यांचाच वारसा चालविणाऱ्या रोहिणी खडसे यांना या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने बोदवडवासियांनी निवडून द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरपंचायत गटनेते जाफर शेख यांनी ॲड.रोहिणी खडसे यांच्या बोदवड शहरात ॲड.रविंद्र भैय्यासाहेब पाटील, उदयसिंह पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या जनआशिर्वाद यात्रेदरम्यान केले.
यावेळी जाफर शेख पुढे म्हणाले की, विद्यमान आमदारांनी नाथाभाऊंनी आणलेल्या निधीला तांत्रिक कारणे देत, विरोधकांनी स्थगिती आणली? किंवा निधी इतरत्र वळवला. यात प्रामुख्याने तेली समाज मंगल कार्यालय, मुस्लिम शादीखाना व विविध प्रभागातील वेगवेगळ्या विकास कामांसाठी मिळालेल्या निधीचा समावेश आहे. म्हणून आता विकास कामांना स्थगिती देणाऱ्यांना कायमची स्थगिती देण्याची वेळ आली असून शहराच्या विकासासाठी रोहिणी खडसे यांना मतदान करुन बहुमताने निवडून आणावे.
यावेळी रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मागील निवडणुकीत शरद पवार साहेबांच्या आदेशाने आपण विद्यमान लोकप्रतिनिधी यांना मतदान केले परंतु त्यांनी गेल्या पाच वर्षात मतदारांचा भ्रमनिरास केला. दिलेले कोणतेच आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून आता मागील चुक सुधारून जनसेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी करावे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.