कष्टकऱ्यांचे देशाच्या विकासात अमूल्य योगदान : आ. राजूमामा भोळे
जळगाव (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडलतर्फे बांधकाम कामगार महिला व पुरुषांसाठी मोफत गृहोपयोगी साहित्य संच (भांडे) वाटप कार्यक्रम नूतन मराठा विद्यालय सभागृह येथे पार पडला. कष्टकरी वर्गाला शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी कटीबद्ध असून कष्टकऱ्यांचे देशाच्या विकासात अमूल्य योगदान आहे, असे प्रतिपादन शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केले.
कामगार महिला, पुरुषांसाठी गृहोपयोगी साहित्य संच वाटप कार्यक्रम उत्साहात
शहरातील कामगार महिला व पुरुषांची यावेळी मोठ्या संख्येने नूतन महाविद्यालयाच्या सभागृहात उपस्थिती होती. प्रसंगी भाजपाच्या महानगर अध्यक्ष उज्वला बेंडाळे, प्रवासी कार्यकर्ता विक्रम भाई, जयेश भावसार, स्मिता वैद उपस्थित होतें. यावेळी आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते कामगार बांधवाना भांडी वाटप करण्यात आली. सदर योजनेमुळे कष्टकऱ्यांना संसारात मोठा हातभार लागला आहे. गृहोपयोगी साहित्य संच मिळाल्याने अनेक महिला व पुरुष कामगारांनी आ. राजूमामा भोळे यांचे आभार मानले.
कष्टकरी व्यक्तींच्या आयुष्यात प्रत्येक दिवस महत्वाचा असतो. रोज काम करणार तर रोज मजुरी मिळणार अशी स्थिती असल्यामुळे त्यांना हातभार म्हणून सरकारी योजना महत्वाच्या असतात. यासाठी आज कामगारांना गृहोपयोगी साहित्य संच वाटप करण्यात आले आहे, असे यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले.