विद्यार्थ्यांची शोधक बुद्धी विकसित होण्यासाठी विज्ञान प्रतिकृती स्पर्धा महत्त्वाची : आ. राजूमामा भोळे यांचे प्रतिपादन
जळगाव (धर्मेंद्र राजपूत) : येथील ए.टी. झांबरे विद्यालयात डॉ. होमी भाभा संस्था मुंबईतर्फे आंतरविद्यालय विज्ञान प्रतिकृती स्पर्धा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांची शोधक बुद्धी विकसित होण्यासाठी विज्ञान प्रतिकृती स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत असे प्रतिपादन शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी केले.
डॉ. होमी भाभा संस्था, मुंबई यांच्यातर्फे आयोजित या स्पर्धेमध्ये जळगाव शहरातील विद्यालयांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अतिशय सुंदर अशा विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनात मांडल्या. यावेळेला आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. केसीई सोसायटीचे सहसचिव ऍड. प्रवीणचंद्र सोनार, मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, सुनील कुलकर्णी, शास्त्रज्ञ डॉ. अस्मा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर आ. राजूमामा भोळे यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रतिकृतींची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या कौशल्याची दाद दिली. विद्यार्थ्यांनी अतिशय कल्पकपणे आणि बुद्धी चातुर्याने विविध प्रकारच्या प्रतिकृती बनवल्या होत्या. काही प्रतिकृतींमध्ये तर टाकाऊ वस्तुपासून अत्यंत सुंदर असे प्रकल्प तयार केलेले दिसून आले. विद्यार्थ्यांचे कौतुक मान्यवरांकडून करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सातत्याने वैज्ञानिक स्पर्धेमध्ये भाग घेत राहिले पाहिजे. त्यामुळे भविष्यात शास्त्रज्ञ होण्याची मोठी संधी आहे असे प्रतिकृती पाहताना आ. भोळे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.